‘रंगात’ आलेल्या जावयाने सासूच्या नाकाचा चावा घेत कान ‘कापला’

बरेली (युपी) : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील एका गावामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या सासरी गेलेल्या आई-वडीलांचे मुलीच्या सासरच्या लोकांसोबत वाद झाले. वादाचे रुपांतर हाणामारी झाल्यानंतर संतापलेल्या जावयाने सासूच्या नाकाचा चावा घेत चाकूने कानावर सपासप वार करून कान कापला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मुलीला मुलगा झाल्याने त्याला पाहण्यासाठी मुलीचे आई-वडील आले होते. या दरम्यान त्यांच्यात वाद होऊन जावयाने सासूवर हल्ला केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी पीलभीत येथील तरुणीचा विवाह बरेली येथील कैंट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहमद अशफाक याच्यासोबत झाला होता. दोन आठवड्यापूर्वी त्यांच्या घरामध्ये मुलाचा जन्म झाला होता. तरुणीचे आई-वडील मुलीच्या सासरी आले होते. काही दिवसांसाठी ते मुलीला आणि जावयाला आपल्या घऱी घेऊन जाणार होते. मात्र अशफाकने पत्नाली माहेरी घेऊन जाण्यास नकार दिला. याच कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाले.

याप्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या घटनेनंतर सासरचे लोक आणि जावई फरार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.