Coronavirus : ‘कोरोना’च्या नावाखाली पाकिस्ताननं पसरले हात, संयुक्त राष्ट्राकडे मागितले साडे चार हजार कोटी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या पाकिस्ताननेही कोरोना साथीच्या आजाराशी सामना करण्यासाठी इतरांकडे हात पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी त्याने संयुक्त राष्ट्र आणि त्याच्या सहकारी संस्थांकडून तातडीने 59.5 कोटी डॉलर (सुमारे साडेचार हजार कोटी रुपये) ची मागणी केली आहे. माहितीनुसार, परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी गुरुवारी एका आभासी बैठकीत सांगितले की, पाकिस्तानने आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी आपल्या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय भागीदारांची मदत घेतली आहे. दरम्यान, परराष्ट्र खात्याने सांगितले की, जागतिक बँकेने पाकिस्तानला या साथीसाठी मात करण्यासाठी त्वरित 24 कोटी डॉलर्स (सुमारे 1800 कोटी) चे पॅकेज प्रदान केले आहे.

आयएमएफ समोरही पसरले हात
ऑगस्ट 2018 मध्ये पाकिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान आर्थिक मदतीसाठी अनेक आखाती देशांसह चीनचा प्रवास केला. या मोहिमेमध्ये त्यांना सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि चीनसह अनेक देशांकडून आर्थिक पाठबळ मिळाले. परिस्थितीवर मात करण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आर्थिक पॅकेजची मागणीही केली होती.

देशात 11 हजाराहून अधिक संक्रमित
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 11 हजार 155 झाली आहे. यातील 79 टक्के लोक स्थानिक पातळीवर संक्रमणाचे बळी ठरले आहेत. तर 237 बळी गेले आहेत. कोरोना विषाणूमुळे देशातील 253 आरोग्य कर्मचार्‍यांनाही संसर्ग झाला आहे.

सिंध मशिदींमध्ये नमाज पठण करण्यास मनाई
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या सरकारने रमजान दरम्यान मशिदींमध्ये नमाज पठण करण्यास मनाई केली आहे. प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, ‘सिंध सरकारने निर्णय घेतला आहे की लोकांनी त्यांच्या घरात नमाज पठण करावे. रुग्णालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रूग्ण दाखल आहेत आणि आपली आरोग्य व्यवस्था कोलमडू नये अशी आमची इच्छा आहे.