घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मीरात दहशतवाद्यांनी गजबजले लाँचिंग पॅड

श्रीनगर : वृत्तसंस्था – लष्कराच्या 15 व्या कोअरचे कमांडर लेफ्टनन्ट जनरल केजेएस ढिल्लो यांनी सांगितले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे लाँचिंग पॅड पूर्णपणे सक्रिय झाले असून दहशतवाद्यांमुळे गजबजले आहेत. पाकिस्तानी लष्कर अंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) आणि नियंत्रण रेषे (एलओसी) वर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसखोरी करू देण्यासाठी कटकारस्थान करत आहे, परंतु भारतीय लष्कर प्रेत्येकवेळी हे प्रयत्न हाणून पाडत आहे.

लेफ्टनन्ट जनरल ढिल्लो म्हणाले, तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा की, आता पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यात आणि शांतता भंग करण्यात यशस्वी होणार नाही. लष्कराने पोलीस, सीआरपीएफ व अन्य सुरक्षा दलांसोबत एकत्र येत कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी मजबूत उपाययोजना केली आहे.

आम्ही काश्मीरातील स्थिती सुधारण्यासाठी सर्व पक्ष, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी व अन्य अनेक लोकांच्या मदतीने प्रयत्न केले आहेत. कोअर कमांडर यांनी जम्मू-काश्मीरमध्ये मागील तीन दशकात पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा उल्लेख करत म्हटले की, आजही पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी कँप आणि लाँचिंग पॅड दहशतवाद्यांनी गजबजले आहेत.

पुलवामानंतर पाकला बरेच काही समजले
पुलवामा हल्ल्याच्या सुमारे एक आठवडा आधी चिनार कोअरचा कार्यभार स्वीकारणारे ढिल्लो यांनी म्हटले की, 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर दहशतवादी आणि पाकिस्तानला खुपकाही समजले आहे. पुलवामा हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर लष्कराने अन्य दलांसोबत एकत्रितपणे दहशतवाद्यांवर प्रहार करण्यास सुरूवात केली.

लेफ्टनन्ट जनरल ढिल्लो म्हणाले की, लष्कराची मुख्य जबाबदारी दहशतवाद्यांना एमलओसी आणि खोर्‍याच्या परिसरापासून दूर ठेवणे ही आहे. एलओसीवर सतत तपासणी, घुसखोरीविरोधी मजबूत यंत्रणा, पाक लष्कराला चोख प्रत्युत्तर आणि खोर्‍यात अन्य दलांशी समन्वय साधून दहशतवाद विरोधी अभियान राबवल्याने स्थिती सुधारली आहे. आम्ही सामान्य लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

ढिल्लो यांच्या ठिकाणी बीएस राजू
लष्कराच्या 15 व्या कोअरला चिनार कोअरसुद्धा म्हटले जाते. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये चिनार कोअरची जबाबदारी सांभाळणारे लेफ्टनन्ट जनरल केजेएस ढिल्लो पुढील काही दिवसात दिल्ली येथील लष्कराच्या मुख्यालयात लष्कर सचिव म्हणून नवी जबाबदारी स्वीकारणार आहेत. तर, ढिल्लो यांच्या जागी बीएस राजू 1 मार्चला चिनार कोअर कमांडर म्हणून पदभार स्वीकारतील.