पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबातील 5 जणांची चाकू गळा कापून अन् कुर्‍हाडीने घाव घालत हत्या

इस्लामाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – पाकिस्तानातील रहिम यार खान शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या अबुधाबी कॉलनीतील एका हिंदू कुटुंबामधील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे, रामचंद्र मेघवाल यांच्या कुटूंबातील पाच सदस्यांना ठार मारण्यात आले आहे. दरम्यान, या मागील कारण अस्पष्ट असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा पाकिस्तनातील अल्पसंख्याक हिंदू आणि सिख समुदायातील लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूज इंटरनॅशनलच्या माहितीनुसार, रामचंद्र मेघवाल यांचे वय ३५-३६ असल्याचं सांगितलं जात असून ते आपल्या कुटूंबियांसमवेत अबुधाबी कॉलनीत शांततामय जीवन जगत होते. मेघवाल यांचा टेलरिंगचं दुकान होतं. मेघवाल कुटूंबातील पाच सदस्यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरुन चाकू आणि कुऱ्हाड जप्त केल्या आहेत.

मेघवाल शांतमय जीवन जगत होते, परंतु तेच हल्लेखोरांना रुचलं नाही, हल्लेखोर कोण आहेत आणि हत्या का करण्यात आली, याबाबत काही स्पष्टता नाही, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेमुळे पाकिस्तनातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पहिल्यांदाच अशी घटना घडली नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. कधी दुकानं लुटली जातात तर तर कधी अत्याचार केले जातात. अनेकदा धर्मस्थळेही उद्ध्वस्त केली जातात. ताकदीच्या जोरावर धर्म परिवर्तन केले जाते. या सर्व घडामोडीवर या कट्टरपंथीयांना रोखण्यास इमरान सरकारला अपयश आलं आहे. अटारीच्या मार्गाने फेब्रुवारी महिन्यात भारतात आलेल्या १०० हिंदू कुटुंबीयांनी पाकिस्तानात होत असलेल्या अत्याचारांचं दु:ख सांगितले होते. या हिंदू कुटुंबात महिला, लहान मुले, युवक युवतींचा सहभाग होता. पाकिस्तानात माणुसकी संपली आहे असा आरोपही या कुटुंबीयांनी केला होता.