Coronavirus : ‘कोरोना’मुळं कंगाल पाकिस्तानचं कंबरडं मोडलं ! बेरोजगारी, दारिद्रय आणि तुटीत कमालीची वाढ

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला कोरोना विषाणू साथीने अजून संकटात टाकले आहे. त्याचा प्रभाव सर्वत्र दिसत आहे. बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. सरकारच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की या साथीच्या काळात पाकिस्तानची स्थिती खालावली आहे. सरकारी आकडेवारीत जी तूट दर्शविली गेली होती ती सध्या 7.4 टक्क्यांवरून 9.4 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार स्वत: वित्त मंत्रालयाची कागदपत्रे ही माहिती देत आहेत.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दोन सरकारी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर असे म्हटले आहे की येणाऱ्या काळात ही आकडेवारी दहा टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते. खरं तर, देशाच्या वित्तप्रमुखांनी 8 मे रोजी वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीत हे प्रमाण 9 टक्क्यांवर जाण्याची शंका व्यक्त केली होती. परंतु गुरुवारी त्यांनी असे सांगितले की ते याबाबत निश्चितपणे काही सांगू शकत नाहीत. ते म्हणाले की, संपूर्ण जगात कोरोना विषाणूबद्दल संभ्रम आहे, म्हणून काहीही सांगणे कठीण आहे. सध्याचा टप्पा हा पाकिस्तानसाठी सर्वात वाईट असल्याचेही ते म्हणाले.

पाकिस्तानमधील गरीबी दर 24.3 टक्क्यांवरून 29 टक्क्यांपर्यंत वाढला आहे आणि तो दर 33.5 टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे पाकिस्तानमधील सुमारे 30 लाख लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. यापैकी दहा लाख उद्योजक आणि 20 लाख लोक सेवा क्षेत्राशी संबंधित आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सच्या म्हणण्यानुसार देशात नोकरी गमावलेल्या लोकांची संख्या 1 कोटी 80 लाखांच्या जवळपास आहे.

पाकिस्तानच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीचा धोका म्हणजे एप्रिल महिन्यात टॅक्स कलेक्शन देखील 16 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. त्याच वेळी एक्‍सपोर्ट मध्ये 2.8 बिलियन डॉलर्सवरून 3.8 बिलियन डॉलर्सपर्यंत घसरण झाली आहे. कोरोना संकटाच्या वेळी पाकिस्तानने देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सुमारे 1.24 ट्रिलियनची आर्थिक मदत जाहीर केली होती.

दरम्यान अधिकाऱ्यांना विश्वास आहे की पाकिस्तानला आयएमएफकडून 5.4 बिलियन डॉलरची आर्थिक मदत मिळेल. यामधून 1.386 बिलियन डॉलरची मदत पाकिस्तानने यापूर्वीच घेतली आहे. याव्यतिरिक्त, कोरोना विषाणूच्या साथीवर लढा देण्यासाठी पाकिस्तानने आशियाई विकास बँकेकडून देखील 500 मिलियन डॉलरची मदत घेतली आहे. याशिवाय जागतिक बँकेकडून देखील त्यांनी एक बिलियन डॉलर्सची मदत घेतली आहे.