‘टूलकिट’ प्रकरणात पाकिस्तानची उडी; जम्मू-काश्मीरवरून PM मोदी-RSS वर साधला ‘निशाणा’

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरून ग्रेटा थनबर्ग यांच्याकडून शेअर केल्या गेलेल्या टूलकिट तयार करण्याच्या आरोपामध्ये दिशा रवि हिला अटक करण्यात आली. पण आता याच प्रकरणात पाकिस्ताननेही उडी घेतली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘तहरिक-ए-इंसाफ’ने या प्रकरणी भारत सरकारवर निशाणा साधला आहे.

‘तहरिक-ए-इंसाफ’ पक्षाच्या ट्विटर हँडलवर एक बातमी शेअर करण्यात आली. यामध्ये लिहिले, की भारत सरकार त्यांच्याविरोधात उठविला जाणारा आवाज दाबत आहे. मोदी आणि आरएसएसच्या नेतृत्वात भारतात जे सरकारविरोधात बोलत आहे त्या सर्वांचा आवाज दाबला जात आहे. तसेच जसे जम्मू-काश्मीरमध्ये विरोधकांना शांत केले गेले तसेच इथंही केले जात आहे. याशिवाय क्रिकेटर आणि फिल्म स्टार्सचा वापर करणे लाजिरवाणी बाब आहे. पण आता त्यांनी टूलकिट प्रकरणी दिशा रवि हिला अटक केली. या प्रकरणी पाकिस्तानकडून ट्विटरवर #IndiaHijackTwitter हा हॅशटॅगही वापरला गेला आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने दिशा रविला बंगळुरू येथून अटक केली. आता न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दिशा रवि हिच्यावर निकिता जेकब आणि शांतनू यांच्यासोब मिळून टूलकिट शेअर केल्याचा आरोप आहे.

देशातील राजकारणही तापले
शेतकरी आंदोलनाशी निगडित टूलकिट प्रकरण आता राजकीय स्तरावर मोठा चर्चेचा विषय बनला आहे. दिल्ली पोलिसांनी दिशा रवि यांना बंगळूरू येथून अटक केली. या अटकेनंतर देशभरातील राजकारण तापले आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला या मुद्द्यावरून घेरले.