कुलभूषण जाधव यांच्याबाबत कठोर निर्णय घेऊ : पाक

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या विरोधात कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे वक्तव्य केले आहे. लष्करी न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीचे संकेत त्यांनी दिले आहेत. गृहनगर मुल्तानमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना कुरेशी म्हणाले, आम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत आहोत. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. देशाने तयार व्हायला हवे. जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) पाकिस्तानच्या बाजूने निर्णय होईल, अशी अपेक्षा कुरेशी यांनी व्यक्त केली.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’839af3d3-a781-11e8-92cb-21b29b217b58′]

पाकिस्तानात हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले भारतीय निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याची सुनावनी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. यासंदर्भात बोलताना पाकिस्तानातील पीटीआय पक्षाच्या नवनिर्वाचीत परराष्ट्र मंत्र्यांनी हे वक्तव्य केले.

जाधव हे एक सामान्य व्यक्ती म्हणून नाही तर हेरगिरीच्या आणि दहशतवादी कारवाया करण्याच्या उद्देशाने देशातील बलुचिस्तान भागात घुसले होते, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर जाधव हे इराणमध्ये व्यवसाय करत होते. तेथून त्यांना अटक करून खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण भारताने त्यावेळी लागलीच दिले होते. जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी इराणमधून पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर पकडण्यात आले होते. आता या प्रकरणावरील खटल्याची सुनावणी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहे.