मोदींमुळे दाऊदलाही फुटला घाम 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करून तेथील दहशतवादी तळं उध्वस्त केली. त्यात मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा केला. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारताचा धसकाच घेतला आहे. इतकेच नाही तर, पाकिस्तानात आश्रय  घेतलेला आणि भारताचा मोस्ट वाँटेड गुंड दाऊद इब्राहिम देखील भीतीने गार झाला आहे. कारण गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दाऊद पुरता घाबरून गेल्याचे समजत आहे. असेही समोर आले आहे की, त्याच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या बाॅम्बस्फोटाप्रकरणी भारत दाऊदच्या शोधात आहे. भारतातून पळून गेल्यानंतर तो आधी दुबई आणि त्यानंतर पाकिस्तानात लपला आहे. इतकेच नाही तर तो अजूनही तेथेच आहे. दाऊदचे वास्तव्य सैन्याचे अधिकारी ज्या भागात आहेत त्या भागातच आहे. लष्करी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय जेथे राहतात तेथे कडेकोट सुरक्षा यंत्रणा आहे. त्याचाच फायदा दाऊदने घेतला आहे. याशिवाय पाकिस्तानी गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआय याचेही दाऊदला संरक्षण आहे.

आपण कडेकोट बंदोबस्तात राहत आहोत त्यामुळे भारतीय पोलीस किंवा लष्कर आपल्या पर्यंत पोहोचू शकणार नाही असे दाऊदला वाटत होते. परंतु पुलवामानंतर भारताने पाकिस्तानवर जो हवाई हल्ला केला त्यानंतर मात्र आता दाऊद पुरता हादरून गेला आहे. तो प्रचंड घाबरलेला आहे. त्याला आता त्याच्या जीवाची भीती वाटत आहे. यामुळे यानंतर आयएसआयने देखील खबरदारी घेतली आहे. आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्याला अन्यत्र हलविण्याच्या विचारात आहेत अशी माहितीही समोर आली आहे.

दाऊद लष्कराच्या देखरेखीत
दाऊद सध्या पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात राहत आहे. इतकेच नाही तर, तेथून तो आपला व्यवसाय चालवतो. मुख्य म्हणजे गुन्हेगारी टोळीवरही तो तेथूनच नियंत्रण ठेवत असतो. दाऊद त्याच्या हस्तकांमार्फत भारतातील कारवाया करत असतो. आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये दाऊदचा व्यवसाय पसरला आहे. राॅ ही भारताची गुप्तचर संस्था भारताच्या मागावर आहे. त्याला अमेरिकेनेही आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. यानंतर आता पाकिस्तानने दाऊदची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.