4000 रुपयाची लाच घेताना वनरक्षक आणि वॉचमन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – ट्रक सोडण्यासाठी 4 हजार रुपयाची लाच घेताना वनरक्षक आणि खासगी वॉचमनला पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शुक्रवार) दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली. साईनाथ दिलीप कुवर (वय – 28 रा. खुशी आंगण, बिल्डिंग नंबर 3, रूम नंबर 3, रईस पाडा, मनोर, ता.जि. पालघर) असे वनरक्षकाचे नाव आहे तर रोशन पांडू धांगडा (वय 28 रा. सावरखंड, पोस्ट मनोर, ता. जि. पालघर) असे खासगी वॉचमनचे नाव आहे.

तक्रारदार (वय – 42) यांना कृषी विभागाकडून बिरसा मुंडा योजनेतून विहीर मंजूर झाली आहे. या विहीरीचे बांधकामासाठी तक्रारदार यांनी आपल्या शेतामध्ये खोदकाम केले आहे. खोदकामातून निघालेले दगड त्यांनी एका ट्रकमध्ये भरून ते दुसरीकडे नेत होते. त्यावेळी वनरक्षक साईनाथ कुवर याने दगडाने भरलेला ट्रक सोडण्यासाठी गुरुवारी (दि.30) चार हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांनी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेची पडताळणी केली असता वनरक्षक याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम खासगी वॉचमन रोशन धांगडा याच्याकडे देण्यास सांगितले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी बाराच्या सुमारास सापळा रचून खासगी वॉचमन रोशन धांगडा याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले. वनरक्ष आणि वॉचमन यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.