आणखी एक भारतीय कंपनी ‘कोरोना’वर बनवणार लस, अमेरिकन कंपनीसोबत करार, 50 कोटी ‘डोस’ तयार करण्याचं ‘लक्ष्य’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात उच्छाद मांडला आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ या आजारावर उपचार शोधण्यात गुंतले आहेत. मात्र, कोणत्याही देशाला अद्याप यावर लस किंवा औषध मिळू शकले नाही. दरम्यान, भारताच्या Panacea Biotec या कंपनीने कोरोनावरची लस शोधण्यासाठी अमेरिकेतल्या Refana Inc या कंपनीसोबत करार केला आहे. कंपनीने तयार केलेल्या लशीची प्राण्यांवर चाचणी करण्यासआधीच परवानगी मिळाली आहे. माहितीनुसार कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्न करत असलेली पॅनेशिया बायोटेक ही भारतातली पाचवी कंपनी ठरली आहे.

कंपनीने सांगतले कि, पॅनेशिया बायोटेकने कोरोनावर उपचारासाठी लस निर्माण करण्यासाठी आधीच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात आता अमेरिकन कंपनीशी करार झाल्याने लस उत्पादन प्रक्रियेला वेग येईल. तसेच आतापर्यंतचा प्रवास यशस्वी असून ही लस सध्या प्राण्यांवर चाचणी टप्प्यावर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दोन्ही कंपन्यांनी मिळून जवळपास 50 कोटी डोस तयार करण्याचं टार्गेट असल्याचे समजते. या दोन्ही कंपन्यांचं एकत्रित उत्पादन आयर्लंडमध्ये उभारलेल्या लॅबमध्ये होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2021 च्या सुरुवातीला या कंपनीची लस बाजारात येईल. तोपर्यंत किमान 4 कोटी डोस उपलब्ध होतील, असा अंदाज कंपनीने वर्तवला आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनची लस अंतिम टप्प्यात

Johnson & Johnson या अमेरिकेतील दिग्गज औषधं कंपनीने प्राणघातक कोरोना विषाणूंवर औषध सापडल्याचा दावा केला आहे. कंपनीने सांगितले कि, त्यांनी तयार केलेल्या लसीचं परीक्षण अंतिम टप्प्यात सुरू असून औषधाच्या मानवी चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येतील. त्यासाठी कंपनीने अमेरिकन सरकारकडे परवानगीही मागितली आहे. कंपनीने अमेरिकन सरकारसोबत एक करार केला आहे, त्यानुसार औषध यशस्वी ठरल्यास कंपनी सुमारे 1 लाख बिलियन डोजेस तयार करेल.