मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागला, पंकजा मुंडेंची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजी 6 वा पुण्यस्मरण कार्य़क्रम परळी येथे आयोजित करण्यात आला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी होऊ नये म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला आपण हजर राहू शकणार नाही, त्यामुळे मुंबईतील घरीच राहून पुण्यस्मरण सोहळ साजरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांना भावनिक आवाहन केलं आहे. बीड जिल्हाधिकारी यांचे एक पत्र प्राप्त झाले. गेले दोन-तीन दिवस कोरोना आणि 3 जूनच्या कार्यक्रमा संदर्भात त्यांच्याशी चर्चा होत होती. लॉकडाऊन काळात मुंबई ते बीड या प्रवासात काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर घेतला जात होता. 1 जूनला प्रवासाची परवानगी मिळाली पण लॉकडाऊन होण्याच्या निर्णयानंतर आणि मधल्या काळात झालेल्या बदलानंतर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मला विनंती केली आहे की, माझ्या 3 जूनच्या कार्य़क्रमासाठी आखलेला बीड-परळीचा प्रवास रद्द करावा, त्यांच्या विनंतीला मान देऊन मी माझा परळी दौरा रद्द केला आहे, अशी माहिती पंकजा यांनी फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे.

तसेच मी एक जबाबदार नागरिक, मंत्री राहिलेली आहे आणि मी प्रशासनाच्या अडचणी समजू शकते, हा विचार करून तसेच लोकांची काळजी म्हणून 3 जून मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण घरातच राहूनच करेन. माझी बहीण खासदार प्रीतम ताई या परळी येथेच आहेत, त्या दिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन लाईव्ह करतील, असंही त्यांची स्पष्ट केलं.

एखादा अनुचित प्रकार झाला असता किंवा दुसऱ्या एखाद्या करणासाठी संचारबंदी लागली असती तर त्याची पर्वा मी केली नसती. पण इथे लोकांचा जीव आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. अगदी मनावर दगड ठेवून.. गोपीनाथ मुंडे यांचं दर्शन मी ती जूनला घेऊ शकत नाही, हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अतिशय अवघड आहे. मी खूप व्यथित आहे. पण तरीही मी प्रशासनाला सहकार्य़ करण्यास तयार आहे. आपणही सहकार्य करावे आणि कोणीही आपापल्या घरातून बाहेर पडून नये आणि माझ्या पुढील सूचनांची प्रतिक्षा करावी, असंही पंकजा मुंढे म्हणाल्या.