100 कोटींच्या लेटर बॉम्बमुळं ‘राजकारण’ तापलं, परमबीर सिंगांनी स्विकारली नवी जबाबदारी

पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे सनसनाटी आरोप करणारे मंबईचे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी (दि. 22) होमगार्डच्या मुख्यालयात हजेरी लावत महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सचिन वाझे प्रकरणात उचलबांगडी केली होती. त्यांतर इतरही अधिका-यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी एका कार्यक्रमात परमबीर सिंगांची बदली अक्ष्यम्य चुकांमुळे केल्याचे सांगत ही बदली नसून कारवाई असल्याचे स्पष्ट केले होते. यावरून दुखावल्या गेलेल्या परमबीर सिंगांनी थेट गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. पण परमबीर सिंगांनी केलेले धाडस हे खुप मोठे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे त्यांना सरकारच्या रोषाचाही सामना करावा लागू शकतो. त्यांनी पाठविलेला लेटर बॉम्ब हा त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच परमबीर यांची विभागीय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून एकतर पोलीस आयुक्त किंवा गृहमंत्र्यांची विकेट जाणार असल्याचे बोलले जात होते. परंतू पोलीस आयुक्तांची विकेट पडली आहे. दरम्यान भाजपाने हे प्रकरण उचलून धरत गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी केली आहे.