अप्पर पोलीस महासंचालक परम बीर सिंग यांची महासंचालकपदी नियुक्‍ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अप्पर पोलीस महासंचालक परम बीर सिंग यांना महासंचालक पदी बढती देण्यात आली असुन त्यांची नियुक्‍ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदी करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा काढण्यात आले आहेत.

परम बीर सिंग हे सध्या पोलीस महासंचालक कार्यालयात अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणुन कार्यरत होते. दि. २८ फेब्रुवारी रोजी राज्याचे पोलीस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर हे सेवानिवृत्‍त झाले. त्यांच्या जागी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्‍ती करण्यात आली तर मुंबईच्या पोलीस आयुक्‍तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. तेव्हापासुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांचे पद रिक्‍त होते. त्या जागी आता परम बीर सिंग यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. परम बीर सिंग यांची महासंचालकपदी पदोन्‍नती करण्यात आली आहे. परम बीर सिंग हे सन १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापुर्वी ठाणे पोलिस आयुक्‍त म्हणुन देखील काम पाहिलेले होते. आता ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक बनले आहेत.