पिंजर्‍यातून पोपट ‘बुर्रर्र’ झाला, पाकिस्तानी मालकानं मुलीचा घेतला जीव

रावळपिंडी : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका आठवर्षांच्या निष्पाप मुलीची हत्या करण्यात आली. घरात काम करणारी 8 वर्षांची एक मुलगी आपल्या मालकाकडे पोपटाचा पिंजरा साफ करत होती, यावेळी पिंजर्‍याचे दार अचानक उघडले गेले आणि पोपट उडून गेला.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पोपाट उडून गेल्याने मालकाला एवढा राग आला की, त्याने 8 वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली. त्याने मुलीला इतके मारले की, या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. जेव्हा पाकिस्तानच्या लोकांना या घटनेची माहिती समजली तेव्हा त्यांनी आपला संताप व्यक्त केला आणि आता ते सोशल मीडियावर या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत.

ही निष्पाप मुलगी रावळपिंडीत एका कुटुंबात घरकाम करत होती. तिचे नाव जहरा आहे. ही घटना मागच्या रविवारची आहे. ज्या कुटुंबात जहरा काम करत होती, त्यांनी एक पोपट पाळला होता, जहरा घरात साफ-सफाईचे काम करत होती. रविवारी ती पोपटाचा पिंजरा स्वच्छ करत होती, यादरम्यान पिंजरा उघडला गेला आणि त्यातून पोपट उडून गेला.

पोपट उडून गेल्याचे जेव्हा मालकाला समजले, तेव्हा त्याने जहराला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत जहरा गंभीर जखमी झाली, यानंतर तिला बेगम अख्तर रूखसाना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे.

पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार मुलीच्या चेहर्‍यावर, हातावर, बरगड्यांवर आणि पायांवर गंभीर जखमा होत्या. प्राथमिक तपासानुसार तिच्या मांड्यांवरसुद्धा जखमा होत्या, ज्यामुळे मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी नमूने फॉरेंसिक टीमला पाठवले आहेत आणि रिपोर्ट अजून यायचा आहे. मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, या कुटुंबाने मुलीला कामावर ठेवण्यापूर्वी आश्वासन दिले होते की, ते तिला शिक्षण देतील, परंतु त्यांनी तिचा जीव घेतला.