पार्थ पवारांना पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून उमेदवारी ?, रोहित पवारांनी सांगितलं ‘राजकारण’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा रंगली आहे. मात्र यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी मागणी केली म्हणून लगेच पूर्ण होईल, असे नाही, तसेच, पवारसाहेब, अजित दादा, तिथले पालकमंत्री यासंदर्भातील निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात पण निर्णय नेते घेतात. तिथे असलेल्या लोकांना योग्य तो न्याय दिला जाईल असा मला विश्वास आहे, असे रोहित पवार म्हणाले.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी केली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात पार्थ पवार यांच्या आमदारकीवरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेच नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिले आहे. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आल्यास रखडलेली विकासकाम लवकर होतील. त्यामुळे पार्थ यांना संधी द्यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केली आहे. भालके यांच्या निधनानंतर शरद पवारांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. मात्र भालकेंच्या जागी कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल भाष्य करणे त्यांनी टाळल होत. त्यामुळे पंढरपूरमध्ये कोणाला संधी मिळणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.

भगिरथ भालकेंच्या नावाचीही चर्चा
पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाल्यास विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक विरोधात जाणार नाहीत. त्यामुळे पार्थ यांच्यासाठी निवडणूक सोपी असेल, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. पार्थ यांना पोटनिवडणुकीत संधी दिली जावी आणि त्यानंतर पुढे होणाऱ्या निवडणुकीत दिवंगत भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालकेंचा विचार व्हावा, असे या गटाला वाटते. भारत भालकेंच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, 2019 मध्ये पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता.