Bihar Assembly Election : अंतर्गत सर्वेक्षणातून वाढली BJP ची अस्वस्थता, CM नितीश यांच्या लोकप्रियतेत मोठी घट !

पाटणा : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अंतर्गत सर्वेक्षण केले आहे. हा सर्व्ह पक्षाचे सरचिटणीस, एमएलसी आणि प्रदेश उपाध्यक्ष यांच्या ९० जणांच्या पथकाने केले आहे. सूत्रांनुसार, हे सर्वेक्षण २५ ते २८ ऑगस्ट दरम्यान केले गेले आहे. तीन दिवसांपासून या पथकाने पक्षाच्या मंडळ स्तरावर जाऊन माहिती जमा केली आहे. सर्व्हेच्या आधारे भाजपकडे जो अहवाल आला आहे तो धक्कादायक आहे. वास्तविक भाजपच्या या अंतर्गत सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, बिहारमध्ये १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात या वेळी अँटी इनकंबेंसी जास्त आहे.

नितीश यांच्यावर लोकांचा विश्वास कमी!
सर्वेक्षणात ही बाबही समोर आली आहे की, भाजप सोडून आणि आजेडीसह जाऊन, नंतर पुन्हा आरजेडी सोडून भाजपसह जाण्याच्या नितीशकुमार यांच्या या निर्णयानंतर लोक त्यांच्या विश्वासार्हतेवर शंका घेत आहेत. याशिवाय सर्वेक्षणात हेही समोर आले आहे की,लालू प्रसाद यादव यांच्याबाबत नितीशकुमार कुठेना कुठेतरी नरम आहेत. त्याचवेळी भाजपाचे सर्वात मोठे नेते थेट लालूंवर हल्ला करतात.

नितीश यांच्या कामावर लोक खुश नाहीत!
या व्यतिरिक्त नितीश यांच्या या कार्यकाळातील पाच वर्षांच्या कामावर लोक खूष नाहीत. सूत्रांनुसार, भाजपच्या या सर्वेक्षण पथकाने आपला अहवाल बिहार भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना दिला आहे. या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चाही केल्याचे बोलले जात आहे. हेच कारण आहे की, भाजपने या निवडणुकीत असे ठरवले आहे कि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि त्यांच्या कार्यावर अधिक जोर देतील. भाजपचा यावेळचा निवडणूक प्रचारही पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या धर्तीवर आत्मनिर्भर बिहार आहे.

आरजेडीचा हल्ला, जेडीयूचा बचाव
मात्र भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणावर जेडीयू नेते आणि बिहार सरकारचे मंत्री महेश्वर हजारी म्हणाले आहेत की, नितीश कुमार यांची लोकप्रियता कमी झालेली नाही, तर वाढली आहे. यावेळी बिहारमध्ये पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर सरकार स्थापन होईल. तर आरजेडी नेते भाई वीरेंद्र यांनी यावरूनच नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, आता तर त्यांच्या सहकाऱ्यांना देखील समजले आहे कि नितीश कुमार यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.