‘सरकारच्या उक्ती आणि कृतीत फरक’ : प्रवीण दरेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडला ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार होताना दिसत आहे. मात्र आपण ते कधीही होऊ देणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, “राज्यातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करण्यासाठी बॉलिवूडची बदनामी झाली असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत. या सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक आहे” अशी टीका देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दरेकर म्हणतात, “एकीकडे दु:ख व्यक्त करायचं आणि दुसरीकडे एका चित्रपट निर्मात्याला धमक्या देतायत. म्हणायचं एक आणि करायचं एक अशी सध्या राज्यात परिस्थिती आहे.”

दरेकर म्हणाले, “बॉलिवूडची बदनामी करतायत म्हणायचं आणि विनाकारण संघर्ष निर्माण करून मूळ विषयांकडं दुर्लक्ष करण्याचा मुद्दाम, जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मुंबईतून कोणीही बॉलिवूड बाहेर नेत नाही. चित्रपटसृष्टी जातेय असं म्हणत स्थानिकांची बाजू घेत असल्याचं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे” अशी सडकून टीका दरेकर यांनी सीएम ठाकरेंवर केली.

पीएम नरेंद्र मोदींच्या सहनिर्मात्याला धमकी

पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाचे सहनिर्माते अमित वाधवानी यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याबद्दल त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली आहे. यावेळी प्रविण दरेकर हेही उपस्थित होते. वाधवानी यांनी यापूर्वी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.