13 वर्षापुर्वीच्या पवनराजे निंबाळकर खून प्रकरणाला वेगळं ‘वळण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाड्यातील काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर दुहेरी खून प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आरोपी पारस जैन हा माफीचा साक्षीदार बनला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष न्यायालयाने याबाबत दिलेल्या अर्जाला नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे 13 वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणाच्या खटल्याला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या जबाबातून दुहेरी खुनाचे नेमके कृत्य, कट समोर येणार आहे.

पवनराजे निंबाळकर यांचा राजकीय वैमनस्यातून खून करण्यात आला होता. पवनराजे निंबाळकर यांच्यासह वाहनचालक समद काझी यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करून विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यात पारस जैन याने माफीचा साक्षीदार बनण्याबाबत 4 डिसेंबरला सीबीआयच्या विशेष न्यायालयात अर्ज दिला होता.

त्यानंतर झालेल्या सुनावणीमध्ये पारस जैन याचा 20 डिसेंबर रोजी अर्ज मंजूर करण्यात आला. या खटल्यात समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 127 जणांच्या साक्षी झाल्या आहेत. चौथ्या क्रमांकाचा आरोपी असलेला जैन हा आता 128 क्रमांकाचा साक्षीदार बनला आहे. त्याच्यासह दिनेश तिवारी, पिंटू सिह हे अद्यापही कारागृहात आहेत तर माजी मंत्री पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, छोटू पांडे, कैलास यादव व शशिकांत कुलकर्णी हे जामीनावर बाहेर आहेत.

राजकीय वैमनस्यातून खून
काँग्रेसचे तत्कालीन नेते पवनराजे निंबाळकर यांच्याशी राजकीय वैमनस्य असलेल्या पद्मसिंह पाटील यांनी त्यांचा सुपारी देऊन 3 जून 2006 रोजी खून केला होता. निंबाळकर हे मुंबईहून उस्मानाबादच्या दिशेने जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे त्यांची गाडी अडवून गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला. यामध्ये त्यांचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. याप्रकरणी पनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/