पोलीस महानिरीक्षकाच्या (IG) गाडीने पादचाऱ्याला उडवले, पुढे झाले असे काही…

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे- बंगळूरू महामार्गावर एका पादचाऱ्याला उडवून जाणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या (IG) गाडीला स्थानिकांनी पकडले. त्यांनी ती गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. या धडकेत पादचारी तर ठार झाला. मात्र, गाडी पोलीस अधिकाऱ्याची असल्याचे समजल्यावर पोलिसांनी ती गाडी सोडून दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

दत्तात्रय शेवते असे ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे,  तर ही गाडी एका पोलीस महानिरीक्षकाची असल्याचे समोर आले आहे.  हा प्रकार साताऱ्याच्या हद्दीत डी- मार्ट समोर घडला आहे. पुणे – बंगळूरू महामार्गावर इनोव्हा कार ( क्र. एमएच ०९ ईई ०१०८)  या कारने पादाचाऱ्याला उडवले. त्यानंतर तिथे न थांबता कार निघून गेली. स्थानिकांनी हा प्रकार पाहिल्यावर त्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर आणेवाडी टोलनाक्याजवळ ही गाडी अडविली आणि थेट भुईंज पोलीस  ठाणे गाठले. गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. मात्र, गाडीत विशेष पोलीस महानिरीक्षक असल्याचे समजले आणि पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद न करता ही गाडी सोडून देण्यात आली. पोलिसांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, पादचाऱ्याच्या मयताची नोंदही अद्याप पोलीसांनी केली नसल्याचे समजते.