संतापजनक ! पोलिसांना कपडे फाटेपर्यंत मारहाण

मुंब्रा : पोलीसनामा ऑनलाइन – लायसन्स नसणे, ट्रिपल सीट अशा वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाविरोधात कारवाईचा बडगा उगारताच संतप्त झालेल्या वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्याची घटना मुंब्रा येथे घडली. मारहाण केलेल्या चौघांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कारवाई केलेले वाहनचालक वाहतूक कर्मचाऱ्यांवर भररस्त्यात अक्षरश: तुटून पडले होते. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याचे कपडेही फाडले. काही जणांनी तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला.

ठाणे वाहतूक शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या मुंब्रा उपवाहतूक शाखेतील पोलिसांनी दुचाकी वाहनचालकांवर धडक करवाई केली होती. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे अडीचशे दुचाकी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणांनी पोलीस शिपाई अंगद मुंडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातून भांडण वाढून हाणामारीपर्यंत गेले. चौघांनी मुंडे यांचा शर्ट पकडून त्यांना मारहाण केली. हा प्रकार पाहताच इतर पोलीस धावून आले व त्यांनी मारहाण केलेल्या अशपाक कुरेशी, फैजान शेख आणि शमशुउद्दीन बनगी या तिघांना पकडले. त्यांना सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल अटक केली आहे. त्यांचा साथीदार तमशिल कुरेशी हा फरार झाला आहे.

You might also like