काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत, खा. राऊतांचा भाजपाला सूचक इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा या महिनेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे भाजपकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून भाजपासह विरोधकांना एक सूचक इशारा दिला आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. एखादा दगड तुमच्या काचेच्या घरावर बसला तर तुमचा काच महाल खाली येईल. शीशे के घरमे रहनेवाले दुसरों पर पत्थर फेंका नही करते, हा मंत्र देशातील सर्व राजकारण्यांना लागू होतो, असा सूचक सल्ला खा. राऊत यांनी दिला.

खा. राऊत म्हणाले की, धनंजय मुंडेंनी केलेल्या आरोपांचीही तटस्थपणे चौकशी करणे गरजेचे आहे. मुंडेंवर आरोप झाल्यापासून शिवसेनेने धनंजय मुंडेंचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मुंडेंची बाजू घेतली होती. तर आरोप झाले म्हणून मुंडे यांना फाशी देणार का असा सवाल, अनिल परब यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, याबाबत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही, कायद्यासमोर सर्व समान असतात. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे, असे सांगितले. कायदा कुणासोबतही भेदभाव करणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाई करू. कायद्यापुढे कोणताही मंत्री किंवा संत्री मोठा नाही, असे म्हणाले. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार ? असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर देणे देशमुख यांनी टाळले आणि चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे सांगितले.