Coronavirus : ‘कमकुवत’ फुफ्फुस असणार्‍यांना ‘कोरोना’चा सर्वाधिक धोका, संशोधनात आलं समोर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – फक्त भारतच नाही तर जगातील अनेक देश कोरोना विषाणूमुळे त्रस्त झाले आहेत. कोरोना विषाणूस जागतिक साथीचा रोग म्हणून जाहीर केले गेले आहे. वैज्ञानिक कोरोना विषाणूची लस बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, एका अभ्यासात समोर आले आहे की फुफ्फुसांच्या समस्या असलेल्या लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. खरं तर, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील ग्लोबल हेल्थ या संस्थेने कोरोना विषाणूचा अभ्यास केला आहे आणि यात असे आढळले आहे की ज्या लोकांना श्वसनाची समस्या आहे त्यांना कोरोना विषाणूचा धोका जास्त असतो. त्यामुळे श्वसनाच्या स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरविण्याची चर्चा होत आहे.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थने आपल्या संशोधनात म्हटले आहे की कोरोना विषाणूची सुरूवात ही श्वसन प्रणालीशी संबंधित एक समस्या आहे. त्यात कोरोना विषाणूमध्ये SARS (severe acute respiratory syndrome) आहे. या सिंड्रोमला क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज किंवा सीओपीडी म्हणून ओळखले जाते. हा एक दीर्घकालीन फुफ्फुसाचा आजार आहे, ज्यामुळे दीर्घ वेळपर्यंत श्वासोच्छवास घेण्यास अडथडा निर्माण होत असतो. यामुळे एखाद्या व्यक्तीस जर श्वसन प्रणालीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर कोरोना व्हायरस त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थचे सह-वैज्ञानिक वेजेश जैन म्हणाले की, या संशोधनाच्या निकालांमध्ये असे म्हटले आहे की सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरांनी कोरोना विषाणूंमुळे ग्रस्त असलेल्या लोकांना आधी प्राधान्य देण्यास मदत केली पाहिजे. कोविड -१९ नावाचा आजार म्हणजे श्वसन संसर्ग आहे, ज्यात गंभीर परिस्थितीत श्वसन आणि फुफ्फुसांमध्ये बिघाड होतो. दुसरीकडे, ताप आणि खोकला ही सर्वात सामान्य लक्षणे आहेत.

ब्रिटनची युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील संशोधकांनी चीनमधील ७ लहान अध्ययनांच्या निकालांना सखोलपणे वाचले आणि यामध्ये एकूण १,८१३ रूग्णांचा समावेश होता, ज्यामध्ये सर्वच कोविड -१९ ने संक्रमित होते. या दरम्यान असे दिसून आले की श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांना कोरोना विषाणू होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार आतापर्यंत सुमारे १४८ देशांमध्ये झाला आहे. आतापर्यंत भारतात १९५ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यासह ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आपल्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी . कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी घरी सुरक्षित रहावे. संक्रमित व्यक्तीपासून १ मीटर अंतर ठेवावे आणि नियमितपणे आपले हात साबणाने धुवावेत.