पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा भडका ! सलग 12 व्या दिवशी वाढले दर, जाणून घ्या

नवी दिल्ली : एकीकडे संपूर्ण देश कोरोना व्हायरसशी लढत आहे अणि मागील अनेक महिन्यांपासून अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे, तर दुसरीकडे सरकारी इंधन कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे. लागोपाठ 12 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात 53 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 64 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली. नव्या किमती लागू झाल्यानंतर पेट्रोलचा दर मुंबईत 84.66 रुपये प्रति लीटर झाला आहे, तर डिझेलचा दर 74.93 रुपये प्रति लीटर झाला आहे. काल बुधवारी पेट्रोलच्या दरात 55 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 69 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती.

कोरोनाच्या संकटकाळात ज्याप्रकारे इंधनाचे दर वाढत आहेत, त्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे आणि त्यांना आवाहन केले होते की पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवू नयेत. हे सरकारचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे की, त्यांनी लोकांचे दु:ख कमी करावे आणि लोकांना जास्तीत-जास्त कठीण परिस्थितीत ढकलू नये.

पत्रात सोनियां गांधी यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या विरूद्धच्या लढाईत भारताला आरोग्य, अर्थव्यवस्था, सामाजिक आव्हाने यांचा सामना करावा लागत आहे. मला या गोष्टीची चिंता वाटते की, मार्च महिन्यापासून ही समस्या कायम आहे, अशा स्थितीत सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याचा असंवेदनशील निर्णय घेतला आहे, जी वाढ एकदाच नव्हे, अनेकदा केली आहे. तुमच्या सरकारला 260000 करोड रूपयांचा महसुल मिळवायचा आहे, परंतु तुम्हाला हा चुकीचा सल्ला दिला गेला आहे की, पेट्रोल डिझेलची एक्साईज ड्यूटी वाढवावी.

मला या गोष्टीत अविचार दिसत आहे. सरकारने अशा सल्ल्यावर पुन्हा एकदा विचार करावा, कारण देशाची अर्थव्यवस्था अगोदरच डगमगली असताना आता कोरोनाने तिला बेजार केले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, लोकांकडे खाण्यासाठी पैसे नाहीत, व्यापार, उद्योग-धंदे खुप मंदीच्या काळातून मार्गक्रमण करत आहेत.