‘…म्हणून राज ठाकरे, अजित पवार अन् उद्धव ठाकरेंनी मला भाजपा सोड असं म्हणायची हिंमत केली नाही‘

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्यानंतर माजी मंत्री आणि भाजपा नेते विनोद तावडे यांनी आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे दर्शवत म्हटले की, 2019मध्ये विधानसभेची उमेदवारी पक्षाकडून मला मिळाली नाही, त्यावेळी राज ठाकरे, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचे विचारपूस करण्यासाठी फोन आले, परंतु भाजपा सोड, आणि आमच्याकडं ये, असं म्हणण्याची हिंमत त्यांनी केली नाही. तावडे यांच्या निवडीबद्दल बोरिवली येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

तावडे म्हणाले की, असं म्हणायची हिंमत या नेत्यांपैकी कुणीही केली नाही. कारण मी पक्का संघवाला आहे, विद्यार्थी परिषदेचा आहे, हे त्यांना माहिती आहे. पक्षाने आपल्यासाठी चांगला निर्णय घेतला, तर आपल्याला बर वाटतं आणि जर काही वेगळा निर्णय घेतला तर मग वाईट वाटून घेऊ नये. कारण पक्षाने काही विचार केलेला असतो. जर आज तिकीट दिलं नाही, तर वाईट का वाटलं पाहिजे, असं ते म्हणाले.

याप्रसंगी तावडेंच्या निष्ठेचे कौतूक करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, राजकारणात चढउतार येतच असतात. राजकारणात कुणीही एकाच ठिकाणी राहत नाही. हा साप शिडीचा खेळ आहे. त्यामुळे विनोद तावडे यांच्याकडून संयम ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या कार्यकारिणीमधील नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये विनोद तावडे यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अशा आहेत भाजपातील नव्या नियुक्त्या

महाराष्ट्र
1 राष्ट्रीय सहसरचटणीस – व्ही. सतीश
2 राष्ट्रीय सचिव – विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे, विजया रहाटकर
3 राष्ट्रीय प्रवक्ते – संजू वर्मा, हिना गावित
4 अल्पसंख्याक मोर्चा – जमाल सिद्दीकी

विशेष उल्लेखनीय नियुक्त्या
1 युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष – कर्नाटकमधील युवा खासदार तेजस्वी सूर्या
2 आयटी आणि सोशल मीडिया प्रमुख – अमित मालवीय
3 राष्ट्रीय उपाध्यक्ष – छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे