Kolhapur News : खून कर अन् माझ्या मिठीत ये, बहाद्दरानं…

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जांबोटी येथील छायाचित्रकार विजय आवलक्की (५२) यांच्या खुनामागे त्यांच्या पत्नीचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. ‘खून कर आणि माझ्या मिठीत ये,’ हा संदेश मोबाईलवर वाचून रामचंद्र कांबळे यानेच विजय यांच्यावर चाकूने सपासप वार केले. विजय यांची पत्नी सुबोधा हिला अटक केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या छायचित्रकाराच्या खुनाने जांबोटी परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. पहिल्यांदा हा खून प्रमुख संशयित रामचंद्र बाबुराव कांबळे याला विजय यांनी कामावरुन काढल्याच्या व पगार न दिल्याच्या रागातून केल्याचा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, विजय यांची पत्नी सुबोधा हिच्या अटकेनंतर तपास केला असता, धक्कादायक माहिती समोर आली. खून होण्यापूर्वी आणि खून झाल्या नंतर सुद्धा सुबोधा हिने आरोपी रामचंद्रशी मोबाईलवरुन संदेशामार्फत संवाद साधल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोधा हिने ‘खून करुन थेट माझ्या मिठीत ये,’ असा संदेश रामचंद्रला पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे. रामचंद्र आणि नारायण यांनी त्यांच्या अल्पवयीन साथीदारांसोबत निर्दयीपणे खून करुन काहीच घडले नाही, या अविर्भावात एकमेकांना संदेश पाठवून खुनाची माहिती दिली. खून केल्यानंतर त्या पाचही आरोपींनी एका धाब्यावर जेवण केले. जांबोटीत गेल्यानंतर रामचंद्र हा सुबोधाला ठरल्याप्रमाणे भेटला. दरम्यान, रामचंद्र आणि सुबोधा यांनी सराईत गुन्हेगारांना सुद्धा मागे टाकत, विजय यांचे शीर धडावेगळे केल्याने या परिसरात संताप व्यक्त होत आहे.