खातेदाराची 10 लाखांची फसवणूक ! जी एस महानगर बँकेच्या चेअरमनसह संचालक मंडळावर FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – खातेदाराने जमा केलेले धनादेश खातेदाराच्या खात्यावर जमा न करता भोसरी येथील जी एस महानगर सहकारी बँकेने खातेदाराची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी बँकेचे चेअरमन आणि संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2016 या कालावधीत घडला.

बाबासाहेब बाळासाहेब जासूद (रा. विमाननगर, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिजित कस्तुरे (रा. आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, चिंचवड), कुमार मुरलीधर नरावडे (रा. खडकी, पुणे) यांच्यासह जी एस महानगर सहकारी बँकचे चेअरमन आणि सर्व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार बाबासाहेब यांनी त्यांच्या दुसऱ्या कंपनीच्या खात्यावरून सात लाख 25 हजार रुपयांचा धनादेश बँकेत दिला होता. हा धनादेश कंपनीच्या खात्यातून पास होऊन गेला. मात्र महानगर बँकेच्या कुठल्याही कर्ज खात्यावर जमा झाला नाही. बँकेने बाबासाहेब यांची सव्वा सात लाख रुपयांची रक्कम परस्पर गायब केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बाबासाहेब यांनी दुसरा दहा लाख रुपयांचा धनादेश दिला. तो धनादेश खात्यावर जमा झालेला आहे. परंतु त्यातील दोन लाख 75 हजार रुपये देखील बँकेने गायब केली आहे. बँकेने एकूण दहा लाख रुपयांची रक्कम परस्पर गायब करून बाबासाहेब यांची आर्थिक फसवणूक केली आहे. तपास भोसरी पोलीस करत आहेत.