Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2086 नवीन रुग्ण, तब्बल 61 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अनेक लोक संक्रमीत होत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पुणे जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृतांची संख्या वेगाने वाढ असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 2086 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 61 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2086 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 75 हजार 405 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2110 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्य़ंत 1 लाख 50 हजार 738 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 22 हजार 382 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 61 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 36 रुग्ण शहरातील आहेत. तर 25 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3243 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2285 तर हद्दीबाहेरील 958 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण ताथवडे, आजमेरा, थेरगाव, कासारवाडी, पिंपळे सौदागर, सांगवी, रहाटणी, चिखली, पिंपळे गुरव, वाकड, बोपखेल, निगडी, चिंचवड, दिघी, पिंपरी, तळवडे, दापोडी, भोसरी, काळभोरनगर, संत तुकारामनगर, मोशी, पिंपरी, घरकुल, खेड, पाषाण, धानोरी, लोनावळा, चाकण, वडगाव शेरी, वडगाव बुद्रुक, हिंजवडी, पुणे, आळंदी, मालवडी, कोंढवा, हडपसर, जुन्नर, पुणे, धायरी, वारजे, औंध, सासवड येथील रहिवाशी आहेत.