दिलासादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 1682 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पिंपरी / पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात 1682 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत शहरात 53 हजार 132 रुग्ण बरे झाले आहेत.

महानगरपालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 1038 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 हजार 622 वर पोहचली आहे. शहरात आढळून आलेल्या 1038 रुग्णांपैकी 1028 रुग्ण शहरातील असून 10 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहराबाहेरील 1164 रुग्णांवर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान शहरात एकाच दिवशी 30 जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 1330 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 1039 तर शहराबाहेरील 291 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या 30 रुग्णांमध्ये 13 रुग्ण हे मनपा हद्दीतील आहेत तर 17 रुग्ण हे हद्दीबाहेरील आहेत.

शहरामध्ये सध्या 6 हजार 616 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील 390 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. शहरात गेल्या 24 तासात चिखली, आकुर्डी, भोसरी, पिंपळे गुरव, चिंचवड, रहाटणी, निगडी, दिघी, आंबेगाव, सातारा, पुणे, खेड, जुन्नर, अहमदनगर, मावळ, वाघोली, धनकवडी, कौसे, रावेत येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.