Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 1012 नवीन रुग्ण, 24 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात 1012 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 545 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8 ते गुरुवारी दुपारी 4 वाजेपर्यंत शहरामध्ये 1012 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 26 हजार 118 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 1012 रुग्ण हे शहरातील आहेत. आज शहराबाहेरील एकही रुग्ण आढळून आला नाही. तर शहराबाहेरील 342 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 50 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 24 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 21 रुग्ण शहरातील आहेत तर 3 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 545 वर पोहचला आहे. यामध्ये 444 रुग्ण शहरातील तर 101 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 266 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 17 हजार 676 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 4175 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये विकासनगर किवळे, पिंपरी, चिंचवड, भोसरी, कासारवाडी, थेरगाव, मोशी, काळेवाडी, दापोडी, निगडी, नेहरुनगर, रुपीनगर, चऱ्होली, नारायणगाव, शिरुर, येरवडा येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.