राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर अटक केली आहे. सिध्दार्थ बनसोडे असे आमदार पुत्राचे नाव आहे. त्याला पोलिसांनी रत्नागिरी येथुन अटक केली आहे. सिध्दार्थ बनसोडे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. आमदार पुत्राला अटक करण्यात पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड पोलिसांनावर वारंवार होत होता. अखेर पोलिसांनी सिध्दार्थ बनसोडे याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

तानाजी पवार यांच्या सहकार्‍याला मारहाण आणि खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी सिध्दार्थ बनसोडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर 12 मे रोजी गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याप्रकरणी वेगळा गुन्हा दाखल असून त्यामध्ये तानाजी पवार आरोपी आहे. त्यानंतर सिध्दार्थ विरूध्द गुन्हे दाखल झाले. सिध्दार्थ बनसोडे हा रत्नागिरी जिल्हयातील पावस येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला पावसमधून अटक केली आहे.