उद्योगांना वीजबीलात सवलत द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू, औद्योगिकनगरीतील उद्योजकांची मागणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाऊन काळातील वीजेचे उपकर (electricity-bills-during-lockdown-period) आकारू नये, वाढीव विद्युत दराला स्थगिती द्यावी,वीज दर सुटसुटीत करावे, या उद्योजकांच्या मागण्यांची तातडीने पुर्तता करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा -पिंपरी- चिंचवड शहरातील उद्योजकांनी दिला आहे.

लॉकडाऊनमुळे (lockdown-period) गेले आठ ते नऊ महिने व्यवसाय विस्कळीत झाल्याने उद्योगांची अवस्था बिकट आहे. उद्योगांना सावरण्यासाठी लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याचे आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी कोणाचेही वीज बिल माफ होणार नसल्याचे विधान ऊर्जा मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे वीज बिल माफी वरुन उद्योगांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

याबाबत फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे म्हणाले, दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन महावितरण वीज दरवाढ प्रस्तावित करते. वीज नियामक आयोग त्याला मान्यता देते. त्यामुळे येथील उद्योगांना इतर राज्यांच्या तुलनेत वीजेसाठी अधिक दर मोजावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. या काळातील वीजेचे उपकर आकारु नये अशी मागणी केली होती. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी लॉकडाऊनकाळातील वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. लॉकडाऊन काळातील बिल माफ न झाल्यास उद्योजक तीव्र आंदोलन उभारण्याच्या मानसिकतेत आहे.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर म्हणाले, उद्योग अजूनही कोरोनापूर्व स्थितीला आलेले नाहीत. अनेकांची बिले थकली आहेत. नवीन होणाऱ्या उत्पादनाची बिले विलंबाने येत आहे. त्यामुळे येत्या मार्च पर्यंत विज बिलाच्या उपकरात सवलत द्यावी, बिलासाठी हप्ते पाडून द्यावेत, असे ते म्हणाले. सरकारने दिवाळीनंतर वीज बिलात दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्याऐवजी वीज बिल वसुलीसाठी वीज जोड तोडण्याची धमकी दिली जात असल्याचे माजी नगरसेवक मारुती भापकर म्हणाले.