Pimpri News : दोन जुगार अड्यावरील छाप्यात पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवडमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभाग आणि पिंपरी पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत पावणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आणि जुगार अड्डा चालवणाऱ्या अशा एकूण 30 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी पोलिसांनी चिंचवड स्टेशन येथील एम.बी. क्लासीक बिल्डिंगच्या तळमजल्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 84 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 22 जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना जामीनावर सोडण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 18) रात्री सातच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भांडवलकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण येथील तळेगाव चौकात असलेल्या राजाराम गवते बिल्डींगमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका दुचाकीसह 92 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आठ जणांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक विष्णु गौतम भारती यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.