हॉर्न वाजवू नको म्हंटल्यावर त्यानं चक्क पोलिसाच्या कानशिलातच दिली, पुढं झालं ‘असं’ काही

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  हॉर्न वाजवू नको अशी विनंती करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलिसाला दुचाकीस्वाराने कानशिलात लगावल्याची घटना कुदळवाडीजवळ घडली. हा प्रकार बुधवारी (दि.२७) रात्री ८ वाजता केएसबी चौकाकडून कुदळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला.

याप्रकरणी संबंधित युवकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सुमित माणिक देशमुख (२८, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई नितीन आप्पा खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वाकड पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणलेला एक आरोपी पोलिसांच्या कस्टडीमधून पळून गेला होता. त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध पोलिसांसोबत गुन्हे शाखेचे पोलिसही घेत होते.

फिर्यादी खेसे गुन्हे शाखेच्या युनिट एकमध्ये कार्यरत आहेत. ते आरोपीच्या शोधात केएसबी चौकाकडून कुदळवाडी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आले. त्यावेळी सुमित देशमुख हा सँट्रो कार (एमएच 14 डीडी 7272) रस्त्यात थांबवून जोरजोरात हॉर्न वाजवत होता.

खेसे यांनी सुमित देशमुखला पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवत ‘हॉर्न वाजवू नका’ असे म्हणून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावर सुमितने ‘मी गाडी बाजूला घेणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’ असे म्हणून खेसे यांना शिवीगाळ केली.

त्याचबरोबर त्याने खेसे यांच्या कानशिलात लगावत त्यांना धक्काबुक्की केली. त्याने खेसे यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत त्याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.