जमिनीच्या वादातून मारहाण, पिस्तूल डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन (हनुमंत चिकणे) – खरेदी केलेल्या जमिनीच्या वादातून मारहाण करून पिस्तूल डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाळासाहेब शिंदे (रा. बोरिभडक, चंदनवाडी ता. दौंड ) याच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तेजस रंगनाथ म्हेत्रे (वय-२४ रा. सहजपुर, ता. दौंड) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस म्हेत्रे व महेश म्हेत्रे हे जमीन खरेदी विक्री करण्याचे काम करतात. दोघांनी मिळून राहू (ता. दौंड) येथील ३८ गुंठे जमीन खरेदी केली होती. त्या वेळी म्हेत्रे यांचा मित्र राजू सूर्यवंशी यांनी संगितले की बाळासाहेब शिंदे हा तुम्ही घेतलेली जमीनीचे व्यवहार होऊ देणार नाही असे म्हणत आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २ ) दुपारी चाडेचार वाजण्याच्या सुमारास ऊरुळी कांचन येथील एका हॉटेल मध्ये बाळासाहेब शिंदे याला बोलावून घेतले व तेजस व महेश म्हेत्रे यांनी जमीन घेतल्याची माहिती सांगितली, व आपण मित्र आहोत आपल्यात भांडणे करणे बरोबर नाही ती जमीन आम्ही खरेदी केली आहे असे संगितले. त्याचवेळेस बाळासाहेब शिंदे याने तेजस शिंदे याला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

महेश म्हेत्रे भांडणे सोडवायला गेले असता त्यालाही ढकलून दिले. व जवळ असणारे पिस्तूल तेजस म्हेत्रे याच्या डोक्याला लावले व तू माझ्या प्लोटिंग मध्ये पडतो काय, तुला आत्ता जिवंतच ठेवत नाही असे म्हणत गोळी झाडणार तेवढ्यात राजू सूर्यवंशी याने शिंदे याच्या हातावर जोराचा फटका मारला व पिस्तूल खाली पडले. त्याचवेळेस हॉटेल मधील लोक जमा झाले. तेव्हा तू आता वाचला परत भेटल्यास जीवंत सोडणार नाही. असे म्हणून तेथून निघून गेला. याप्रकरणी त्याच्याविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.