PM मोदींची ‘मन की बात’ : ‘कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक’, दुसर्‍या लाटेने देश हादरला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून केंद्र आणि राज्य सरकारं लढाई देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत, असे मोदींनी सांगितले. येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे. कोरोना संकटाच्या काळात लसींचं महत्त्व आता सर्वांना समजले आहे. त्यामुळे लसीच्या बाबतीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मधून केले आहे.

देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थिती चिंतेची बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देश हादरला आहे. अशा या संकटाचा सामना करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण ठेवणं महत्त्वाचं असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा केली. यात लॅबमधील तंत्रज्ञ आणि फ्रंटलाइन वर्कर्ससोबत ते बोलले आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला. गेल्यावेळी आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेवर मात केली. मात्र, दुसऱ्या लाटेने देश हादरला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला आरोग्य तज्ज्ञ आणि त्यांनी दिलेल्या सूचनांना प्राधान्य दिले पाहिजे, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोनाची लढाई जिंकायची असेल तर लसीकरण महत्त्वाचे आहे. पण लसीबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचा मोफत पुरवठा केला जात आहे. कोरोनाच्या या संकटात केंद्र सरकार राज्यांना मदत करण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करत आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

देशात कोरोनाच्या लसीकरणाची मोहीम सुरु आहे. या मोहीमेमध्ये खासगी क्षेत्राने देखील सहभागी होण्याची आवश्यकता आहे. खासगी क्षेत्रातील उद्योगांनी आणि कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. तसेच मोफत लसीकरणाच्या फायद्यांबाबत राज्यांनी जनजागृती करुन नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

महारष्ट्र टास्क फोर्सच्या डॉ. शशांक जोशींसोबत चर्चा
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्याशी चर्चा केली. शशांक जोशी म्हणाले, दुसरी लाट खूप वेगाने आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा यावेळी विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. चांगली बाब ही आहे की, रिकव्हरी रेट आणि मृत्यू दर खूप कमी आहे. यावेळी कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये आणि मुलांमध्येही दिसून येत आहे. लक्षणांमध्ये आणखी भर पडली आहे. लोक घाबलेले आहेत. पण, घाबरण्याची गरज नाही. 80 टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. म्युटेशनमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. विषाणू येत जात राहतो. असे शशांक जोशी म्हणाले.