सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तीनी पंतप्रधानावर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले – ‘मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीत देशाला सावरण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे कौशल्य कौतुकास्पद ठरले असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीही पंतप्रधान मोदीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे सर्वाधिक लोकप्रिय, दूरदर्शी नेते आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये गुजरात उच्च न्यायालयाचा हिरक महोत्सव सोहळा होत आहे. त्यात मला सहभागी व्हायला मिळाले. यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो, असे प्रतिपादन असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी केले.

गुजरात उच्च न्यायालयाच्या हिरक महोत्सवी सोहळा शनिवारी (दि.6) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी न्यायमूर्ती शहा यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. न्यायमूर्ती शहा म्हणाले की, गुजरात उच्च न्यायालयानेही कधीही लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. नेहमीच न्यायदानाचे पवित्र काम केले आहे. गुजरात उच्च न्यायालय ही माझी कर्मभूमी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी या उच्च न्यायालयात जवळपास 22 वर्षे वकील म्हणून प्रॅक्टीस केली तर 14 वर्षे न्यायदान केले.

गेल्या वर्षी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरुन कौतुक केले होते. त्यावेळी ते चर्चेचा विषय बनले होते. मोदी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकप्रिय दूरदर्शी नेते असल्याचे न्यायमूर्ती मिश्रा म्हणाले होते. मिश्रा हे सध्या सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर आता न्यायमूर्ती शहा यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींवर केलेला कौतुकाचा विषय राजकीय वर्तुळात किती चर्चिला जातोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.