CM केजरीवाल घेणार PM मोदींची भेट ! दिल्लीत सुरु होणार नवा अध्याय ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्लीचे तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेणार आहेत. संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात मंगळवारी सकाळी ११ वाजता ही भेट होणार आहे. केजरीवाल आणि मोदी यांची आज भेट होत असतानाच आपचे खासदार संजयसिंग यांनी दिल्ली दंगलीवरील कार्यस्थगन प्रस्ताव दाखल केला असून त्यावर तो आज राज्यसभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत हिंदु मते आपल्यापासून दूर जाणार नाही, हे पाहताना सौम्य हिंदुत्वाचा उपयोग केजरीवाल यांनी केला होता. तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल यांची भूमिका काहीशी बदलेली दिसून येत आहे. कैन्हया कुमार याच्याविरुद्ध असलेल्या देशद्रोहाच्या खटल्याला इतके दिवस दिल्ली सरकारने परवानगी दिली नव्हती. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या सरकारने परवानगी दिली आहे.

गेली पाच वर्षे केजरीवाल यांनी केंद्र सरकारबरोबर संघर्ष करीत कारभार चालविला. मात्र, आता त्यांनी केंद्राशी मिळतेजुळते घेण्याचा विचार सुरु केला असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. त्याचवेळी दिल्ली दंगलीत त्यांनी त्यांना भरभक्कम पाठिंबा दिलेल्या मुस्लिम समुदायाला वार्‍यावर सोडल्याची टिका आता होऊ लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोदी आणि केजरीवाल यांच्या भेटीतून दिल्लीत नवा अध्याय लिहिला जाणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.