मोदींचं राजकारण संपुष्टात आलंय, संघानेही साथ सोडली : मायावती

लखनऊ : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्यातील वाकयुद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका केल्यानंतर बसपा अध्यक्षा मायावती यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. या निवडणुकीत मोदींचं जहाज बुडालं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील आता मोदींची साथ सोडली आहे.

मायावती यांनी ट्विट करून मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी नागरिकांना मोठी आश्वासने दिली. ही आश्वासनं त्यांनी पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाल्याने संघाने भाजपपासून स्वत:ला दूर केलं आहे. त्यामुळेच या संपूर्ण निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक भाजपसाठी मतं मागताना दिसत नाहीत. त्यावरूनच मोदी यांचे राजकारण संपुष्टात आल्याचे दिसत असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना देशाने सेवक, मुख्यसेवक, चहावाला आणि चौकीदारच्या रुपात पाहिले आहे. आता देशाला चांगले राज्य करणारा पंतप्रधान हवा असल्याचे देखील याद्वारे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काल देखील मायावतींनी मोदींवर कडाडून टीका करताना म्हटले होते कि, भाजपामध्ये खासकरून विवाहीत महिला त्यांचे पती मोदींकडे गेल्यावर हा विचार करून घाबरतात कि, कदाचित मोदी आपल्या पत्नीप्रमाणेच आम्हालाही आपल्या पतीपासून वेगळे करणार नाहीत ना, अशी भीती त्यांना वाटते. आता मायावती यांच्या या वक्तव्यावर नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.