मोदींची वर्तणूक पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखी : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात. ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांप्रमाणे वागतात, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज राजधानी नवी दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषण केले. यावेळी नायडू यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांचे अनेक नेते पोहेचले. केजरीवाल यांनीही चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. यावेळी केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येऊन २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना पराभूत करण्याचे अपील केले.

केजरीवाल म्हणाले की , ‘जेव्हा कोणी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री होतो. तेव्हा तो फक्त पक्षाचा मुख्यमंत्री नसतो तर संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो. अशाच पद्धतीने पंतप्रधानही कुठल्या पक्षाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा असतो. ते विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी अशी वर्तणूक करतात. जसे ते भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.

आज चंद्राबाबू नायडू यांनी पुकारलेल्या उपोषणाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, शरद यादव यांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांना विरोधाचा सामना करावा लागला होता. काही ठिकाणी मोदींविरोधात मोठे पोस्टर्सही लावण्यात आले होते.