‘PM’ मोदींचा ‘CM ‘ ठाकरेंवर अप्रत्यक्ष ‘निशाणा’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली. या सभेत ते अनेक मुद्द्यांना घेऊन बोलले. त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा, ज्यावरून देशात अशांततेचे वातावरण पसरलेले आहे. मात्र या सभेत मोदींनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. मोदी म्हणाले, ‘हे विधेयक पारित झाल्यानंतर विरोधक या कायद्याचा वेगळ्या रीतीने प्रचार करून जनतेला भ्रमित करत आहेत. जेव्हा दिल्लीतील कच्ची घरं आम्ही पक्की केली तेव्हा आम्ही कोण कुठल्या धर्माचे आहे हे विचारले होते का ? काही पुरावे मागितले होते का?’ असा सवाल विरोधकांना नरेंद्र मोदींनी केला. तसेच या विधेयकाविरुद्ध असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आणि इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील टोला लगावला आणि हे विधेयक कसे फायदेशीर आहे हे सांगितले.

तसेच नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘जे मुख्यमंत्री म्हणत आहेत की हा कायदा राज्यात लागू करणार नाही, त्यांनी आपल्या मुख्य महाधिवक्त्यासोबत थोडी चर्चा करावी, राज्य असे पाऊल उचलू शकते का नाही हे विचारा. मुख्यमंत्री असं बोलून स्वतःचे हसे करून घेत आहेत,’ असा टोला मोदींनी उद्धव ठाकरेंसह इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना फटकारले आहे. तसेच नागरिकत्व कायद्याचा विरोध करणारे लोक देशात प्रचंड हिंसाचार माजवत असून हा एकप्रकारे मतं गोळा करण्याचा प्रकार आहे. तसेच मोदी म्हणाले की एकवेळ माझा पुतळा जाळा पण गरीबाची रिक्षा जाळू नका,’ असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सभेला हजर होता. सभेदरम्यान मैदानात उपस्थित लोकांनी दिल्ली पोलीस जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तर काहींनी ‘मोदी-मोदी’ चे नारे लावले.

मोदींनी सभेत काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केली असून ‘हिंसाचाराला काँग्रेसची मुक संमती आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून ते आतापर्यंत ३५ हजार पोलीस शहीद झाले आहेत. देशातील हिंदू किंवा मुस्लीम बांधवांसाठी हा कायदा नाही. काँग्रेस आणि अर्बन नक्षलवादी लोकांना फसवण्यासाठी खोटे बोलत आहेत,’ असा घणाघाती आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच काँग्रेसमुळे देशात आंदोलन घडत असून देशाला हिंसेचा सामना करावा लागत आहे. आंदोलनातील नागरिकांना काँग्रेसची फूस असते असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/