मंदीर फोडणाऱ्या 2 चोरट्याना सांगलीत अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरज तालुक्यातील वाजेगाव येथील मंदीर फोडणाऱ्या दोन चोरट्याना गुरुवारी सांगलीत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पावणेतीन किलोच्या चांदीच्या 4 विटा, देवांच्या मूर्ती, तलवार, गदा असा सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. दोघांनाही मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

श्रीनिवास ऊर्फ सोन्या डोंबनाल (वय 26, रा. माळवाडी), शिवाजी पाटील (वय 43, रा. भिलवडी, ता. पलूस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील चोरट्यांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी चोरट्याना पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले. हे पथक सांगली शहरात गस्त घालत होते.

गस्त घालत असताना पथकातील साईनाथ ठाकूर यांना चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी दोघेजण सराफ कट्टा येथे कर्नाळ रस्ता मार्गे येणार असल्याची माहिती खबऱयाद्वारे मिळाली. पथकाने सापळा रचला. त्यावेळी दोघे संशयित एक पोते घेऊन येताना दिसले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्या जवळ असलेल्या पोत्याची झडती घेतल्यानंतर त्यात चांदीच्या 4 विटा, देवांच्या मूर्ती, तलवार, गदा असा मुद्देमाल सापडला. त्याबाबत चौकशी केल्यावर सोन्या याने त्याचा मिरजेतील साथीदार विजय मस्के यांच्यासोबत वाजेगाव येथील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. तर शिवाजी ने चांदीच्या दागिन्यांच्या विटा बनवून दिल्याचे सांगितले. दोघांनाही पथकाने अटक केली. त्यांना मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, साईनाथ ठाकूर, निलेश कदम, शँकर पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.