वर्दळीच्या ठिकाणी महिलेचा विनयभंग करणार्‍या पोलिस हवालदाराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय दिनकर कोंडे (50, रा. कोयना बिल्डींग, फ्लॅट नं. 26, हांडेवाडी रोड, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव बु. परिसरात राहणार्‍या 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असुन त्यानुसार पोलिसांनी कोंडे यांच्याविरूध्द भादवि 354 (अ) (1) (1), 354 (अ)(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता धनकवडी येथील के.के. मार्केटच्या बस स्टॉपवर घडली आहे. पोलिस हवालदार संजय कोंडे यांना बुधवारी रात्री साडे आठ वाजता सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत महिला या कसबा पोलिस चौकी बस स्टॉप ते धनकवडी असा प्रवास करून के.के. मार्केट चौकात उतरल्या. त्यावेळी बस स्टॉपवर बसलेले पोलिस हवालदार संजय कोंडे यांनी अचानकपणे पिडीत महिलेच्या गुप्‍तांगास हाताने दाबुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्‍न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला.

ही घटना घडल्यानंतर पिडीत महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिस हवालदार कोंडे यांच्याविरूध्द फिर्याद दिली. हवालदार कोंडे हे शहर वाहतुक शाखेत कार्यरत आहेत. गुन्हयाचा अधिक तपास सहकारनगर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदार एस.पी. ढोणे करीत आहेत. विनयभंगाच्या गुन्हयात एखाद्या पोलिस हवालदाराला तात्काळ अटक होण्याची ही अलिकडील काळातील पहिलीच वेळ आहे. मात्र, भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी पोलिस हवालदारानेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे.