‘तोडपाणी’ करणार्‍या पोलिस हवालदाराचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विना हेल्मेट दुचाकी वाहन चालकासोबत ‘तोडपाणी’ करत पैसे घेवुन त्याला सोडून देणार्‍या वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. ही निलंबनाची कारवाई वाहतूक शाखेच्या उपायुक्‍त तेजस्वी सातपुते यांनी केली आहे.

पोलिस हवालदार बाळासाहेब सदाशिव घाडगे असे निलंबीत करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. घाडगे हे शहर वाहतूक शाखेच्या कोंढवा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. दि. 19 जानेवारी रोजी ते महिला पोलिस उपनिरीक्षक मस्के आणि इतर सहकार्‍यांसह शत्रुंजय चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करीत होते. सकाळी साडेदहा ते 11 वाजण्याच्या दरम्यान पोलिस उपनिरीक्षक मस्के यांनी विना हेल्मेट दुचाकी चालविणार्‍यांना दुचाकी चालकांना थांबवुन त्यांच्याविरूध्द दंडात्मक कारवाई केली.

मात्र, त्याचवेळी तेथुन एक दुचाकी वाहन चालक विना हेल्मेट जात होता. हवालदार घाडगे यांनी त्याला थांबविले. त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. पण, हवालदार घाडगे यांनी त्या वाहन चालकाशी तोडपाणी केले आणि त्याच्याकडून पैसे घेतले. त्याच्यावर कुठलीही कारवाई न करता त्या वाहन चालकाला सोडून देण्यात आले. घाडगे यांचे हे गणवेषातील वर्तन पोलिस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे अशोभनीय वर्तन असल्याने तसेच पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलिन करणारे असल्याने त्यांना वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्‍तांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे.