८० हजाराची लाच घेणारा पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एखाद्यावर गुन्हा दाखल झाला की अनेकदा आरोपी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतात. आता त्याच्या सुनावणीत पोलीस काय अभिप्राय देतात, यावर त्या आरोपीला जामीन मिळणार की नाही हे ठरत असते. अशा प्रकारात सहकार्य करण्यासाठी देवनार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचा अडीच लाख दर आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना पकडले.

दत्तात्रय गोविंद चौधरी (वय ५०) असे त्यांचे नाव आहे.
तक्रारदार, त्यांचा भाऊ व मित्रांविरोधात देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत. या गुन्ह्यामध्ये तक्रारदारासह सर्व आरोपींना अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे. जामीनाची अंतिम सुनावणी अद्याप झालेली नाही. या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या विरोधातील गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी चौधरी यांनी तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांनी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करताना चौधरी यांनी त्यात तडजोड करुन अडीच लाख रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. लाचेच्या रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून ८० हजार रुपये स्वीकारताना चौधरी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

लोकसेवकांकडून लाचेची मागणी होत असेल तर, नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा अथवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.