पोलिस ठाण्यात 20 हजाराची लाच स्विकारणारा सहाय्यक निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सांगली / जत : पोलीसनामा ऑनलाइन – फसवणुकीच्या गुन्हयातील आरोपींना अटक करण्यासाठी आणि फसवणुकीची रक्‍कम परत मिळवुन देण्याकरिता 20 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या सहाय्यक पोलिस निरीक्षकास पोलिस ठाण्याच्या आवारातच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी केली आहे.
गजानन वसंत कांबळे असे लाच स्विकारणार्‍या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्याविरूध्द जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे हे जत पोलिस ठाण्यात कार्यरत असुन त्यांच्याकडे एका फसवणुकीच्या गुन्हयाचा तपास होता. त्यांनी तक्रारादारास फसवणुकीच्या गुन्हयातील आरोपींना अटक करण्यासाठी आणि फसवणुकीची रक्‍कम परत मिळवुन देण्यासाठी 50 हजार रूपये अ‍ॅडव्हासन्स आणि उरलेले 1 लाख 50 हजार रूपये काम झाल्यानंतर मागितले होते. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार नोंदविली. प्राप्‍त झालेल्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये सहाय्यक निरीक्षक कांबळे हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी जत पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळयाचे आयोजन केले. सरकारी पंचासमक्ष 20 हजार रूपयाची लाच घेताना सहाय्यक निरीक्षक कांबळे यांना रंगेहाथ पकडले. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक राजेंद्र साळुंखे, पोलिस कर्मचारी संजय कलकुटगी, भास्कर भोरे, जितेंद्र काळे, संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ, बाळासाहेब पवार आणि अविनाश सागर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी अन्यथा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.