धक्कादायक ! कोंबड्यांच्या झुंजीत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

मनिला : वृत्तसंस्था – जगभरात अनेक देशांमध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. अशाच पद्धतीने फिलीपाइन्समधील ( Philippines) सान जोसे शहरात कोंबड्यांची सुरू असलेली झुंज थांबवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदेशीर कोंबड्याच्या झुंजीवर पोलिसांनी छापा ( raid) मारला. मात्र, झुंजीसाठी असलेल्या एका कोंबड्याने पोलिसावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या पायाची नस कापली गेल्याने या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

याविषयी अधिक माहिती देताना, प्रांताचे पोलीस प्रमुख कर्नल अर्नेल अपुड ( Arnel Apud) यांनी सांगितले की, नॉदर्न समर भागात ही घटना घडली. या घटनेत पोलीस अधिकारी लेफ्टिनंट ख्रिस्टिचन बोलॉक ( Christian Bolac) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कोंबड्यांच्या झुंजीवर छापा मारल्यानंतर पोलिसांकडून उपस्थितांकडून जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी कोंबड्याच्या पायावर असलेला धारदार ब्लेड पोलीस अधिकारी लेफ्टिनंट ख्रिस्टिचन बोलॉक यांच्या डाव्या पायाच्या नसला लागल्याने त्यांच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्स्राव झाला. यामध्ये अधिक रक्त गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. फिलिपाइन्समध्ये कोंबड्यांच्या झुंजीला ‘तुपडा’ म्हणतात. हा खेळ स्थानिक पातळीवर लोकप्रिय आहे. या झुंजीवर लोक सट्टादेखील खेळतात.

कोंबड्याच्या पायाला ब्लेड ( Blade)
या ठिकाणी होणाऱ्या लढाईमध्ये कोंबड्याच्या पायाला ब्लेड बांधले जाते. त्यामुळे या कोंबड्याच्या झुंजीत एक कोंबडा मृत्यूमुखी पडतोच. कोरोना 9 Corona) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने बंदी घातली असूनदेखील कोंबड्यांची झुंज सुरू होती. त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन कोंबडे देखील जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, आपल्या २५ वर्षाच्या पोलीस सेवेत पहिल्यांदा अशी घटना घडल्याचे पोलीस प्रमुख कर्नल अर्नेल अपुड यांनी म्हटले आहे.