मुंबईत पोलीस ठाण्यात ‘गटारी’ साजरी करण्यास मनाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – श्रावण महिना जवळ आला की अनेक पोलीस ठाण्यांमध्ये आखाड साजरा केला जातो. त्यासाठी आवारात रसरशित चिकन, मटण शिजविले जाते. पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी त्याच्यावर ताव मारतातच. पण त्यावेळी पोलीस ठाण्यात येणाऱ्यांनाही आग्रह केला जातो. काही वेळा तर त्याअगोदर पेयपानही होते. मग काहींना डान्स करायची इच्छा होते. डीजेच्या तालावर अनेकदा बेधुंद होऊन पोलीस नाचतानाचे व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. पण यंदा असे काही होणार नाही. किमान मुंबईत तरी असे दृश्य दिसणार नाही. कारण पोलीस ठाण्यात गटारी साजरी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हत्या झालेली व्यक्ती, आत्महत्या किंवा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या आत्म्यास शांती मिळावी, यासाठी गटारीला कोंबडी किंवा बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे. यातून अंधश्रद्धेला खतपाणी न घालण्यासाठी गटारी साजरी करू नये, अशा सूचना कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त विनय चौबे यांनी दिल्या आहेत. पोलीस ठाण्यात गटारी साजरी केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे ही सार्वजनिक जागा असल्याने या ठिकाणी प्राण्यांची कत्तल नको, असे बजावण्यात आले आहे. पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना याकडे लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यंदा २ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असून, गुरुवारी १ आगस्ट रोजी आषाढी अमावस्या म्हणजेच गटारी आहे. या दिवशी किंवा दोन-तीन दिवस आधी पोलीस ठाण्यांमध्ये गटारी साजरी केली जाते. यात, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांबरोबरच विशेष शाखा, पोलिसांशी संबंधित इतर कार्यालयातही कोंबडी – मटणाचे जेवण केले जाते. ही प्रथा बंद करावी,अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मग बाहेरुन पार्सल आणले तर चालेल का असा प्रश्न विचारला जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –