रेमडेसिवीर काळाबाजारातील आरोपी फरार, पोलिस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा घेऊन काही लोक रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे समोर आले आहे. नागपूर शहरात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणातील एक आरोपी फरार झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. मनीष गोडबोले असे निलंबित केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये पाचपावली पोलिस स्टेशनच्या हद्दीत रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी आणि मेडिकल स्टोअर्सचा मालक उबेद राजा इकराम उल हक हा फरार झाला होता. पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांनी आरोपी ताब्यात असताना त्याच्यावर नीट लक्ष दिले नाही त्यामुळे आरोपी हातून निसटल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांना आज निलंबित केले.

राज्यात कोरोनाच्या नावाखाली आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजारही सुरु आहे. याच प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलिसांच्या डोळ्या देखत पलायन केल्याने याची मोठी किंमत पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांना मोजावी लागली आहे.