Video : पोलिसांच्या गाड्या ‘त्या’ सोसायटीमध्ये गेल्या, अन् भलतेच घडलं

पुणे/नवी सांगवी  : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. या दरम्यान पोलिसांची गाडी पाहिली तरी नागरीकाची चांगलीच पळापळ होते. पोलिसांकडून सोसायटीमध्ये देखील गस्त घातली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या गाडीचा सायरनचा आवाज आला की सोसायटीमध्ये बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची पळापळ होते. असाच एक प्रकार रविवारी पिंपळे सौदागर येथील एका सोसायटीत घडला. पोलिसांच्या पाच ते सहा गाड्या सायरन वाजवत सोसायटीत दाखल झाल्या.

पोलिसांच्या एवढ्या गाड्या पिंपळे सौदागरमध्ये सायरन वाजवत दाखल झाल्याने या ठिकाणाच्या नागरिकांना आपल्या भागात काहीतरी झाले असेल. त्यामुळे प्रत्येकजण खिडकीतून बाहेर काय चालले आहे हे पाहात होता. ज्या सोसायटीसमोर गाड्यांचा ताफा थांबला त्या सोसायटीतील लोकांच्या काळजीने ठोके चुकले. सोसायटीतील लोक घरात पळून गेले. पण या ठिकाणी सगळे उलटेच झाले. पोलीस तपासणीसाठी किंवा कारवाईसाठी आले नव्हते तर ते वेगळेच गिफ्ट घेऊन आले होते.

नोकरीनिमित्त अमेरिकेत अडकलेल्या एका पित्याला पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर मध्ये असलेल्या आपल्या मुलाचा वाढदिवसाची चिंता सतावत होती. अमेरिकेप्रमाणे भारतात देखील लॉकडाऊन असल्यामुळे मुलाचा वाढदिवस कसा साजरा होणार ? यापूर्वी त्याचे वाढदिवस नातेवाईक, मित्रपरिवारांसोबत साजरे केले. मात्र एक महिन्यापासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे.

त्यातच अमेरिकेत नोकरीनिमित्त अडकलेल्या राजीव लोचन यांना आपला मुलगा वत्सल याचा रविवारी वाढदिवस साजरा करायचा होता. मात्र, लॉकडाऊनमुळे तो साजरा होणार नाही याची खंत त्यांच्या मनात होती. दरम्यान राजीव यांनी ही खंत पुणे पोलिसांसमोर ई-मेलच्या स्वरुपात मांडली. अत्यंत भावनिक होत त्यांनी पोलिसांनी केवळ त्यांचे कुटुंबीय राहात असलेल्या पिंपळे सौदागरमधील रोजलँड सोसयटी समोरून जाण्याची विनंती केली. पुणे पोलिसांना मिळालेला हा मेल त्यांनी सांगवी पोलिसांना पाठवला. यानंतर सागंवी पोलीस ठाण्याचे प्रमुख ज्ञानेश्वर साबळे, सोसायटीचे चेअरमन संतोष मस्कर यांच्यासह सांगवी पोलिसांचा फौजफाटा पाच ते सहा गाड्यांसह त्या ठिकाणी पोहचला.

पोलिसांनी वत्सल व त्याच्या आईला खाली बोलावले. आणि पोलिसांच्या गाडीवरच केक ठेवून वाढदिवसाचे गीत गाऊन वत्सलचा केक कापला. यासर्व गोष्टींची वत्सलसह त्याच्या सोसायटीमधील नागरिकांना कसलीच कल्पना नव्हती. त्यामुळे अचानक अशा पद्धतीने वाढदिवस साजरा झाल्याने वत्सल आणि त्याची आई भारावून गेले. सांगवी पोलीस ठाण्याचे प्रमुख ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले की, लोक आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे आम्ही देखील जनतेची काळजी घेत आहोत. जनतेच्या प्रत्येक भावनांशी आम्ही जुळवून घेत आहोत. त्याच्या वडिलांची इच्छा होती की माझ्या मुलाला आम्ही किमान शुभेच्छा तरी द्याव्यात. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले.