रिक्षा चालकाकडून ‘मंथली’ घेणारा पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा आॅनलाईन – शहरातील रस्त्यांवरुन प्रवाशांची वाहतूक करणारे जीप, रिक्षा, सहा आसनी यांना वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात दरमहा हप्ता द्यावा लागतो, हे सर्वश्रृत आहे. घर चालवायचे असल्याने कोणीही त्याबाबत तक्रार करायला पुढे येत नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे ही लाचखोरी निर्विघ्नपणे सर्वत्र सुरु आहे. पण अमरावतीतील एका रिक्षाचालकाने ही लाचखोरी आपल्यापुरती संपविण्याचा निर्धार केला आणि त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने साथ देत हप्ता म्हणून ३०० रुपये घेताना एका पोलीस हेड कॉन्स्टेबलला सापळा लावून पकडले.

पुण्यातील ५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

संजय विनायक सांगोले (वय ५०, रा. अजंनगाव पोलीस स्टेशन, जि. अमरावती) असे या पोलीस हेड कॉंस्टेबलचे नाव आहे.  तक्रारदार हे आॅटो रिक्षा चालवितात. त्यांच्यावर कारवाई करु नये, म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल सांगोले याने दरमहा ४०० रुपये हप्ता द्यावा लागेल अशी लाच मागितली. पण त्यांना ही लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची २३ आॅक्टोंबरला पडताळणी केली. त्यात सांगोले यांनी तडजोड करुन ३०० रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली पोहनकर, रवींद्र जेधे, महिला पोलीस हवालदार ज्योती झाडे, युवराज राठोड, अतुल टाकरखेडे, शैलेश कडु यांनी पोलीस ठाण्यात सापळा लावला. तक्रारदार रिक्षाचालकाकडून ३०० रुपये स्वीकारताना सांगोले यांना पकडण्यात आले.

या लाचेची मागणीतील रक्कम कमी असली तरी अशा प्रकारे राज्यभरातील लाखो रिक्षा, जीप चालकांना राजरोसपणे लुटण्याचा प्रकार सुरु आहे. तो अधिकृतपणे उघड झाला आहे.